BMC Election 2026: राज-उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा करताच भाजपने मुंबईत शिवसेनेच्या जागा वाढवल्या, तरीही एकनाथ शिंदे अडले, नेमकं काय घडलं?
BMC Election 2026

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात जागावाटपाची चर्चा सुरु आहे. शिंदे गटाकडून भाजपकडे 100 जागांची मागणी करण्यात आली आहे.

BMC Election 2026: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईत शिवसेना-मनसे युतीची (Shivsena MNS yuti) घोषणा केली. शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याने मुंबईतील मराठी व्होटबँक त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. हा धोका ओळखून आता भाजपने (BJP) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या जागावाटपाच्या पहिल्या बैठकीत भाजपने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेसाठी 227 पैकी फक्त 52 वॉर्ड सोडण्याची तयारी दाखवली होती. मात्र, आता राज-उद्धव यांच्या युतीनंतर भाजपने शिंदे गटाला जास्त जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे. भाजपने शिंदे गटाला 52 वरुन 70 जागांवर लढण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, भाजपच्या या प्रस्तावावरही शिवसेना नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. (Raj Thackeray and Uddhav Thackeray alliance )

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने शिवसेनेला 70 जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे. भाजपकडून पहिल्या चर्चेत शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. तेव्हा शिवसेनेचे नेते प्रचंड नाराज झाले होते. मात्र, यानंतर शिवसेना-भाजपच्या जागावाटपाच्या बैठकांमध्ये चर्चा होऊन भाजपने आता 70 जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे. परंतु, शिवसेनेकडून 100 जागांची मागणी करण्यात आली आहे. मात्र, भाजपने त्याला नकार दिल्याची माहिती आहे. त्यामुळे अद्याप शिवसेना-भाजपमध्ये 25 ते 30 जागांचा तिढा कायम आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असून आज पुन्हा भाजप शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडणार आहे. या बैठकीत हा तिढा सुटणार का, हे बघावे लागेल.



