‘मे. लोकराज्य ग्रुप’च्या कामाची चौकशी करून कंत्राट रद्द करा, कोथरूड-बावधन परिसरातील घनकचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांच्या तक्रारी;
१५ दिवसांत कारवाईची वंचित बहुजन माथाडी संघटनेची मागणी.

कोथरूड : दि. ६ : कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील घनकचरा व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या ‘मे. लोकराज्य ग्रुप’ या ठेकेदाराच्या कामाबाबत नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून संबंधित ठेकेदाराकडून करण्यात येणारे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप अर्जदार विशाल जयद्रथ सरवदे यांनी केला असून, ठेकेदाराची चौकशी करून त्याला काळ्या यादीत टाकावे तसेच कंत्राट रद्द करावे, अशी मागणी त्यांनी पुणे महानगरपालिकेकडे केली आहे.
अर्जानुसार, परिसरातील रस्ते, चौक तसेच विविध ठिकाणी नियमितपणे कचरा उचलला जात नसल्याने कचऱ्याचे ढीग दिवसभर पडून राहत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

काही महिला सफाई कर्मचारी नगरसेवकांचे नाव सांगून संबंधित हद्दीत झाडू मारण्यास नकार देत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे काही भागांमध्ये अस्वच्छता निर्माण होत असल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. तसेच सफाई कर्मचारी वेळेवर कामावर येत नसून, आवश्यक मनुष्यबळाची कमतरता असल्याने स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुणे महापालिकेसोबत झालेल्या करारानुसार आवश्यक यंत्रसामग्री व मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जात नसल्याने कंत्राटी अटींचा भंग होत असल्याचेही अर्जात म्हटले आहे. अस्वच्छतेमुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे अर्जदाराने सांगितले.
दरम्यान, संबंधित ठेकेदाराच्या कामाची तातडीने चौकशी करून दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, कंत्राट रद्द करून सक्षम ठेकेदाराची नियुक्ती करावी आणि तोपर्यंत पर्यायी व्यवस्थेद्वारे परिसराची स्वच्छता राखावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच १५ दिवसांच्या आत योग्य कार्यवाही न झाल्यास कोथरूड परिसरात शांततामय आंदोलन करण्याचा इशाराही अर्जदाराने दिला आहे.




