टॉप न्यूज़

वन जमिनीवरील घरांचे पुनर्वसन होणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई : राज्यातील सरकारी, वन जमिनी तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर १ जानेवारी २०११पूर्वी उभारण्यात आलेल्या सर्व झोपड्यांना सरकार पूर्ण संरक्षण देणार आहे.

या रहिवाशांचे एसआरए, म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन केले जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. या अंतर्गत मुंबई उपनगरांसह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचे येत्या तीन महिन्यांत विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भातील धोरणाला मंजुरी मिळाल्यानंतर बावनकुळे यांनी गुरुवारी निवेदनाद्वारे याबाबतची माहिती दिली. या निर्णयानुसार आता राज्यभरात युद्धपातळीवर कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

विकास आराखडा, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र किंवा वन विभागाचे कडक नियम असल्यामुळे अनेक ठिकाणी या जमिनींवरील घरे त्याच जागी नियमित करणे शक्य नाही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांच्या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. त्यांच्याद्वारे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

पुढील तीन महिन्यांत सर्व संबंधित जमिनींवरील रहिवाशांचे बायोमेट्रिक आणि प्रत्यक्ष सर्वेक्षण पूर्ण केले जाईल. ज्या जागांवर पर्यावरण किंवा तांत्रिक कारणांमुळे घरे नियमित करता येणार नाहीत, तिथल्या रहिवाशांना म्हाडा, सिडको किंवा एसआरएच्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये कुठे आणि कसे सामावून घेता येईल, याचा संपूर्ण आराखडा (मास्टर प्लॅन) यादरम्यान तयार केला जाईल. १ जानेवारी २०११पूर्वीच्या एकाही अधिकृत पात्र रहिवाशाला बेघर होऊ दिले जाणार नाही आणि सरकार त्यांच्या हक्काच्या घरासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे, अशी ग्वाही महसूलमंत्र्यांनी यावेळी दिली.

कामगार न्याय सुरक्षा

कामगार न्याय सुरक्षा भारत सरकार मान्यताप्राप्त रजिस्टर वृत्तपत्र असून प्रामुख्याने भारतातील श्रमिकांच्या अधिकारांच्या, सामाजिक, कल्याण आणि रोजगार सुरक्षाच्या साठी काम करणारा एक वृत्तपत्र समूह आहे,हा असंगठित क्षेत्र, औद्योगिक कामगार आणि निर्माण श्रमिकांच्या कायदेशीर अधिकार, न्याय व विभिन्न सरकारी कल्याणकारी योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी तथा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अग्रेसर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!