पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त)च्या वतीने कंत्राटी सफाई कामगारांचा ‘आक्रोश मोर्चा
दिवाळीपूर्वी कंत्राटी कामगारांना बोनसच्या नुकसानभरपाईपोटी प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांची दिवाळी गोड करावी

पुणे शहर प्रतिनिधी: पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त)च्या वतीने कंत्राटी सफाई कामगारांचा ‘आक्रोश मोर्चा’ आयोजित करण्यात आला. दिवाळीपूर्वी कंत्राटी कामगारांना बोनसच्या नुकसानभरपाईपोटी प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांची दिवाळी गोड करावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
बोनस बंद झाल्यामुळे कामगारांचे दरमहा ₹१,७५० चे नुकसान होत असून, याबाबत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही निर्णय न झाल्याने कामगारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी युनियनचे अध्यक्ष कॉ. उदय भट यांनी कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण थांबवून त्यांना न्याय देण्याची मागणी केली. अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजीत नायर यांना निवेदन देण्यात आले. प्रोत्साहन भत्त्याबाबतचा निर्णय स्थायी समितीत घेतला जाईल, अशी हमी प्रशासनाकडून देण्यात आली.
या मोर्चात युनियनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने कंत्राटी सफाई कामगार सहभागी झाले.


