
मुंबई – मोहरम जुलूसमध्ये लोकांच्या जीवावर उठलेल्या फय्याज प्रेमजीने बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे (बीबीए) शिक्षण घेतले असून, त्याच्या वडिलांची पेंटची कंपनी आहे. तेथे तो वडिलांना मदत करायचा.उच्चशिक्षित असूनही त्याने या हल्ल्याचा कट नेमका का रचला? हा ‘लोन वुल्फ’ हल्ला होता का? या सर्व अंगांनी पोलिसांसह गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी पथक तपास करत आहे.
पुण्याच्या विमाननगर परिसरात फय्याज राहण्यास आहे. त्याचे लग्न झाले असून त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नसल्याचे समजते. त्याची आई आणि बहीण इराणमध्ये राहते. गेल्यावर्षी तो नोकरीसाठी इराण, इराकमध्ये जाऊन आला होता. तिथे एक ते दोन महिने नोकरी केली. त्यानंतर वडिलांच्या व्यवसायात मदत करायचा. फय्याजने १५ दिवसांपूर्वी मुंबई गाठली. डोंगरीतील हॉटेलच्या रूममध्येच ५० किलो झिंक फॉस्फाइड आणि ३० हजार अँटीबायोटिकच्या कॅप्सूल ऑनलाईन मागवल्या. त्याने कॅप्सूलमध्ये एक-एक ग्रॅम झिंक फॉस्फाइड भरले. त्यानंतर अशा तीन-तीन विषारी कॅप्सूल एका पिशवीत भरल्या आणि जुलूसमध्ये सहभागी झाला. एकटा असल्याने एवढ्याच गोळ्या तयार करू शकलो, असे त्याने पोलिसांना सांगितले. अन्य कॅप्सूलचे काय झाले, त्याचा तपास सुरू आहे. फय्याजचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्याची तपासणी सुरू आहे. सगळे सुरळीत असतानाच अचानक तो हिंसक वृत्तीकडे का वळला? तो कुणाच्या संपर्कात आला का? यामागे कुठले दहशतवादी कनेक्शन आहे का? असा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
… आणि मोठा अनर्थ टळला
मिरवणुकीदरम्यान पाणी, सरबत, अन्नपदार्थांचे वाटप करण्यासाठी पोलिसांनी अगोदरच आलेल्या अर्जावरून परवानग्या दिल्या होत्या. त्यात प्रेमजी हा कॅप्सूल वाटपासाठी विनापरवानगी आल्याने पोलिसांच्या नजरेत आला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ काही कॅप्सूल सापडल्या. पोलिसांनी तातडीने कारवाई केल्यामुळे कॅप्सूलचे पुढील वितरण थांबले, असे पोलिस उपायुक्त जयंत मीना यांनी सांगितले.
झिंक फॉस्फाइड का?
कलिंगड खाल्ल्याने पायधुनीच्या डोकाडिया कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता. हे मृत्यू कलिंगडात आढळलेल्या झिंक फॉस्फाइडमुळे झाल्याचे फोरेन्सिक तपासात उघड झाले होते. त्या बातम्या फय्याजने वाचल्या. त्यातूनच त्याने कॅप्सूलमध्ये मिसळण्यासाठी झिंक फॉस्फाइडची निवड केली का? याबाबतही तपास सुरू आहे. झिंक फॉस्फाइडचा शेतातील उंदीर मरण्यासाठी वापर होतो. ते सहज उपलब्ध होते म्हणून याचा वापर केल्याचे तो पोलिसांना सांगत आहे.
‘लोन वुल्फ’ म्हणजे काय?
‘लोन वुल्फ’ म्हणजे अशी व्यक्ती, जी कोणत्याही दहशतवादी संघटनेच्या थेट आदेशाशिवाय किंवा मदतीशिवाय स्वतःच हिंसक कृत्य किंवा दहशतवादी हल्ला करते. ही व्यक्ती कट्टरपंथी विचारसरणीने प्रेरित असते, परंतु हल्ला एकट्यानेच आखते आणि अंमलात आणते.
महिलेचीही सतर्कता
मिरवणुकीत सहभागी एका महिलेला संशय आल्याने तिने कॅप्सूल वाटणाऱ्याकडे चौकशी केली. पण, संशय दूर न झाल्याने त्या महिलेने एक कॅप्सूल उघडून बघितली असता तिला त्यात राखाडी रंगाची पावडर आढळली. यामुळे महिलेचा संशय अधिक बळावला आणि तिने वेळ न घालवता तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
फय्याज मानसिक रुग्ण असल्याचा पोलिसांचा अंदाज; स्वत:च घेताे विविध औषधे
प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी फय्याज मानसिक आजाराने ग्रस्त असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो व्यवस्थित झोपलेला नाही. तसेच, वैद्यकीय सल्ल्याविना तो स्वतःच्या मनाने विविध औषधांच्या गोळ्या घेत असल्याचेही उघड झाले आहे. याशिवाय, समाजातील एका विशिष्ट घटकाविषयी त्याच्या मनात तीव्र द्वेषाची भावना असल्याची माहितीही पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आल्याचे समजते. या सर्व बाबींच्या अनुषंगाने पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

