पुणे महानगरपालिकेतील भ्रष्टाचार व बेकायदेशीर बांधकामांविरोधात अन्नत्याग सत्याग्रह – दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी
माहिती अधिकार कार्यकर्ता एकता परिषदचे आंदोलन सुरू

पुणे प्रतिनिधी – पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभागामधील भ्रष्टाचार, बेकायदेशीर बांधकामे, शासकीय जमिनींचा गैरवापर आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळवलेले परवाने याविरोधात अन्नत्याग सत्याग्रह करण्यात येत आहे. संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

अन्नत्याग सत्याग्रहाच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
१) मौजे वडगाव बुद्रुक येथील एलिझा लाईफस्टाईल या इमारतीसाठी पाटबंधारे विभागाच्या सुमारे ३९ गुंठे संपादित शासकीय जागेचे खोटे कागदपत्र तयार करून एफएसआय (FSI) मध्ये घोटाळा करण्यात आला आहे. तसेच भारत संरक्षण मंत्रालयाचे (MOD) बनावट ना हरकत प्रमाणपत्र सादर करून पुणे महानगरपालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्यात आले आहे.
त्यामुळे या इमारतीचा भोगवटा तात्काळ रद्द करावा व जागामालक बाळासाहेब जाधव, विकसक महेश पुनरे, आर्किटेक्ट सिद्धार्थ हरिश्चंद्र व इतरांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.
२) वडगाव बुद्रुक, सिंहगड कॉलेज रोड येथील कृष्ण कुंज रेसिडेन्सी या प्रकल्पामध्ये भारत संरक्षण मंत्रालयाचे बनावट ना हरकत प्रमाणपत्र सादर करून तसेच इमारतीमागील ओढ्यावर अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आले आहे.
म्हणून जागामालक बाळासाहेब जाधव, विकसक सोपान लंके व इतर तसेच खीरे-भिडे आर्किटेक्ट यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा व संबंधित आर्किटेक्टना काळ्या यादीत टाकावे.
३) सिंहगड रोड परिसरातील पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या सुमारे १०० गुंठे जागेवर अधिकारी व विकासक यांनी संगनमत करून बांधकाम परवाना दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
त्या जागेवरील बेकायदेशीर बांधकाम तात्काळ पाडावे आणि संबंधित अधिकारी, जागामालक व विकासकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.
४) वडगाव बुद्रुक येथील पाटबंधारे विभागाच्या जागेवर बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक २ यांनी दिलेला बांधकाम परवाना रद्द करावा व संबंधित विकसकांवर फौजदारी कारवाई करावी.
५) टीडीआर सेलच्या तत्कालीन उपअभियंता आशालता साळवी यांनी वडगाव खुर्द येथील विशाल जगदीश देशपांडे व इतरांना दिलेली डीआरसी (DRC) रद्द करावी. तसेच आशालता साळवी यांना तात्काळ निलंबित करून त्यांनी दिलेल्या सर्व टीडीआर प्रकरणांची सखोल चौकशी करावी.

प्रतिक्रिया :
“पुणे महानगरपालिकेमध्ये शासकीय जमीन, एफएसआय आणि टीडीआर प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाले आहेत. या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तात्काळ फौजदारी कारवाई झाली नाही तर भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” अशी भूमिका किशोर कांबळे, सागर ढावारे,संजय साळवी, विरेश हिरेमठ, दीपा कांबळे, आकाश नागटिळे,या आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.


